“मराठ्यांची हार होऊ देऊ नका!”; थकलेल्या शरीराने जरांगेंची समाजाला भावनिक साद
घरात बसू नका, मराठ्यांची हार होऊ देऊ नका. प्रत्येक जण अंतरवालीत आला पाहिजे, समाजाची ताकद दिसली पाहिजे,” असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं.
बैठक पार पडणार आहे. त्यासाठी आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजबांधवांना मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईला जायचं की नाही हे उद्या ठरवू असेही जरांगेंनी म्हटले आहे. त्यामुळे उद्याच्या आंतरवलीतील बैठकीत नेमकं काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरीर थकले असले तरी त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे. मुंबई मोर्चाची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या अंतरवली येथे होणाऱ्या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे. घरी बसून चुकीचा संदेश देऊ नका, तर मोठ्या संख्येने येऊन आपली ताकद दाखवा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
आता सामना अटीतटीचा
जरांगे पाटील म्हणाले की, आता सामना अटीतटीचा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने अंतरवालीला आलं पाहिजे. ज्यांना मुंबईला यायचं आहे, त्यांनी आम्ही ज्या मार्गाने जाऊ त्या मार्गावर सहभागी व्हावं. त्यामुळे आगामी आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याचे संकेत त्यांनी दिले. मराठा समाजबांधवांना आवाहन करताना जरांगे यांनी काही काळ शेतातील कामं बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. प्रत्येकाने आपल्या शेतातील काम सोडा आणि या, असं ते म्हणाले. मात्र, ज्यांना काही अडचणी आहेत किंवा ज्यांना आंदोलनात सहभागी होणं शक्य नाही, त्यांनी गावातच राहून जबाबदारी सांभाळावी, असेही जरांगेंनी स्पष्ट केलं.
गावकऱ्यांनी आंदोलनासाठी जाणाऱ्यांची व्यवस्था करावी
आंदोलनासाठी बाहेर पडणाऱ्या समाजबांधवांना गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचं आवाहनही जरांगे यांनी केलं. जे कोणी येणार आहेत, त्यांना गावकऱ्यांनी गाडी करून द्या. जाणाऱ्या पोरांची गावकऱ्यांनी व्यवस्था करा, असं त्यांनी म्हटलं. तसंच, आंदोलनाच्या मार्गावर जे मार्ग निश्चित केले जातील, त्या ठिकाणी समाजबांधवांनी जेवणाची सेवा आणि आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, असंही त्यांनी सांगितलं.
‘समाजाची ताकद दिसली पाहिजे’
आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येण्याची गरज असल्याचं जरांगे यांनी अधोरेखित केलं. प्रत्येक जण इथं आला पाहिजे. समाजाची ताकद दिसली पाहिजे, असं म्हणत त्यांनी आंदोलनासाठी मोठ्या जनसहभागाचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या आवाहनामुळे आगामी काळात अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
