Pune स्मार्ट वीजमीटर बसवण्याच्या मोहिमेला गती मिळाली असून, सुमारे ३८ लाख ग्राहकांपैकी १० लाखांहून अधिक ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील सात तालुक्यांत ही मोहीम राबवली जात आहे. सुरुवातीला महावितरणची कार्यालये, सरकारी इमारती आणि वसाहतींमध्ये बसवणी पूर्ण करण्यात आली; आता घरगुती ग्राहकांपर्यंत मोहीम पोहोचली आहे.
परंतु स्मार्ट मीटर बळजबरीने बसविले जात असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. तसेच स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. तसेच महावितरणकडून स्मार्ट मीटरसाठी होत असलेल्या आग्रहामुळे ग्राहकांच्या मनात वेगवेगळे संशय निर्माण होत आहेत.महावितरणने ९ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘स्मार्ट मीटर पंधरवडा’ जाहीर करून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. कर्मचारी घरोघरी भेट देऊन स्मार्ट मीटरची माहिती देत आहेत.
मात्र, काही ठिकाणी ग्राहकांची संमती न घेता बसवणी होत असल्याचा आरोप केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील काही नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिलात वाढ झाल्याची तक्रार नोंदवली आहे. “वीज वापर पूर्वीसारखाच आहे; पण बिल वाढले,” अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली.ग्राहक संघटनांच्या मते, स्मार्ट मीटरविरोधात राज्यभरात अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. वीज नियामक आयोगाकडेही काही प्रकरणे सुनावणीअंतर्गत आहेत.
त्यामुळे शहरात संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या स्मार्ट मीटर बसवणीला वेग असला तरी उर्वरित ग्राहकांपर्यंत मोहीम पोहोचल्यावर विरोध वाढणार का, याकडे लक्ष लागले आहे. जनजागृती आणि पारदर्शक माहिती देणे हेच या योजनेच्या यशाचे मुख्य सूत्र ठरणार आहे. स्मार्ट मीटर योजनेमुळे आधुनिक वीज व्यवस्थापनाकडे वाटचाल होत असली तरी नागरिकांचा विश्वास संपादन करणे हे महावितरणपुढील मोठे आव्हान ठरणार आहे.
