Shivsena News: जे उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात घडलं, तेच एकनाथ शिंदेंकडूनही सुरू.

Pune शिवसेनेत काही वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी आमदार-खासदारांसह ऐतिहासिक बंड केलं होतं.त्यावेळी बंडखोरांपैकी अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवलं होतं.

ते भेटत नाही,फोन उचलत नाही किंवा त्याला रिप्लाय करत नाही असे एक ना अनेक आरोपही आमदार-खासदारांनी केले होते. ठाकरेंनी जे केलं,त्याचीच पुनरावृत्ती एकनाथ शिंदेंकडून त्यांच्या शिवसेनेत सुरू आहे का,अशी शंका उपस्थित करण्यात यावी असा खळबळजनक आरोप बड्या नेत्यानं केला आहे.

शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. यानंतर त्यांची भूमिका समोर आली आहे. त्यांनी आपण पक्षात नाराज असल्याची कबुली दिली आहे. मात्र, नाराजी म्हणजे पक्ष सोडण्याचा निर्णय नव्हे, असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. यामुळे कीर्तिकरांच्या ‘घरवापसी’च्या चर्चांना सध्यातरी ब्रेक लागला आहे.

गजानन कीर्तीकर म्हणाले,’मी दलबदलू नाही आणि पक्ष सोडणार नाही.पण पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून अनेक नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येतात. या अन्यायग्रस्त नागरिकांना सरकारकडून न्याय मिळवून देण्यासाठी पक्षप्रमुखांशी संपर्क साधणे आवश्यक असते. मात्र, एकनाथ शिंदे यांची भेट मिळत नाही, त्यांच्याशी फोनवरुन संपर्क होत नाही. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे कामं मार्गी लावण्याकरिता अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितले.

शिवसेनेत आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मात्र, पक्षाकडून योग्य प्रतिसाद मिळावा,एवढीच अपेक्षा असल्याचं कीर्तीकर यांनी सांगितलं. तसेच त्यांनी यावेळी ‘उद्धव ठाकरेंच्या काळातही अशीच परिस्थिती होती. ते म्हणाले, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असतानाही आपली नाराजी होती आणि आताही जवळपास तशीच परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे शिवसेनेत कुजबुज सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. असं जर असेल, तर आम्हाला तुमचा विचार करावा लागेल, अशा कठोर शब्दांत शिंदेंनी कीर्तीकर यांना इशारा दिला आहे.

तसेच गजानन कीर्तिकर यांनी आजच संध्याकाळी एक कार्यक्रम नियोजित असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही, याबाबतही निर्णय घ्यावा लागेल,असे शिंदे यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचवेळी एकनाथ शिंदेंनी घडलेल्या घटनेवर खुलासा करा,असंही कीर्तीकरांना म्हटलं आहे.