Sharad Pawar : पुण्याचे प्रश्न सोडवण्याची कुवत आमच्यातच; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांचं मोठं वक्तव्य

Pune News राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुणे शहर कार्यकारिणीच्या 50 व्या मासिक आढावा बैठक पुणे येथे पार पडली.

यानिमित्तानं आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुसंवाद साधला. तसेच महानगर पालिका नागरी प्रश्नांची सोडवणूक असण्याची कुवत ज्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये आहे, त्यांच्याच हातात आली पाहिजे, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, पालिका निवडणुका आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आता स्वच्छ भूमिका घेतली की, एका ठराविक काळामध्ये ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ यांच्या निवडणुका घेतल्याच पाहिजेत. त्यामुळे साहजिकच संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आणि मला जागरूक राहावं लागेल. तयारी करावी लागेल आणि निर्णय घ्यावे लागतील. आपण गांधी-नेहरूंचा विचार मानतो. त्यामुळे निवडणुका उद्या होतील, त्यावेळेला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ म्हणून आपण मतदारांच्या पुढे जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, इतरही काही पक्ष आहेत. काही पक्ष देश पातळीवर आणि काही पक्ष राज्यामध्ये आम्हाला सहकार्य करतात. काही पक्ष स्वतंत्रपणानं निवडणूक लढण्याचा विचार करतात. यासंबंधीचा निकाल पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी हे लवकरच घेतील. तसेच अन्य मित्र पक्षांशी सुसंवाद साधून त्यांच्याबरोबर जायचं की नाही? गेलो तर कार्यक्रम काय? किती जागा मिळतील? कोणत्या त्या असतील? या सगळ्यांचा निर्णय आपले अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी हे तुम्हा लोकांच्या विश्वासाने निर्णय घेतील आणि त्याने आपण निवडणुकीला सामोरे जाऊया, असे आवाहन पवार यांनी केले.

शरद पवार म्हणाले की, प्रशांत जगताप स्वतः महापौर होते. अंकुश काकडे स्वतः महापौर होते. कमलताई होत्या, अनेकांची नावं सांगता येतील. आपल्यामध्ये महानगर पालिकेच्या कामांचा अनुभव असलेले अनेक सहकारी आहेत. त्यामुळे साहजिकच आपली नैतिक जबाबदारी पुण्याच्या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद आणि दृष्टी आज तुमच्यामध्ये असेल तर, ही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. त्या जबाबदारीमध्ये यश मिळवायचं असेल तर, महानगरपालिकेला उत्तम उमेदवारांची निवड करायला हवी, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, नव्या पिढीच्या तरुण उमेदवारांना संधी देऊन त्यांची निवड करणं आणि लोकांचा विश्वास संपादून महानगर पालिका इथलं सूत्र तुम्हा लोकांच्या हातात येईल, तुमच्या सहकाऱ्यांच्या हातात येईल, याची काळजी ही आपल्याला घ्यायची आहे. माझी खात्री आहे की, लोकांनी एकदा साथ दिली की आपण पूर्ण ताकदीने पुण्याचे नागरी प्रश्न जे आहेत, त्याच्या सोडवणुकीसाठी जे जे करावे लागेल ते आपण करू. त्या दृष्टीने आजची ही बैठक एक विचार घेऊन जायचं आहे, निर्धार घेऊन जायचा आहे. उद्याची महानगर पालिका नागरी प्रश्नांची सोडवणूक असण्याची कुवत ज्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये आहे, त्यांच्याच हातात आली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्नांची पराकष्टा करू, हाच निकाल घेऊन तुम्ही इथनं गेलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

शरद पवार यांनी सांगितले की, उद्या पक्ष कुणाशी युती करायची? यासंबंधीचा निकाल घेईल. त्या निकालाच्या नंतर सगळ्या जागा या आपल्याकडे काय येणार नाहीत. काही जागा मित्रांना सोडाव्या लागतील. ज्या जागा आपण लढवू, तिथं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या उमेदीच्या आणि नक्कीच जिंकू शकेल, अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम पक्षाचं नेतृत्व करेल. त्यांना साथ देणं, सहकार्य करणं ही तुम्हा लोकांची जबाबदारी आहे. त्याची पूर्तता तुम्ही कराल, हा विश्वास या ठिकाणी बाळगतो. तुम्हाला या कामाला शुभेच्छा देतो, असे शरद पवार यांनी म्हटले.