Pune News राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबाबत सरकारला महत्त्वाची सूचना केली आहे. कर्जमाफीचे काही निकष शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असल्याने त्यात योग्य बदल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, “शेतकरी कर्जमाफी हा निर्णय चुकीचा नाही, मात्र त्यातील काही अटी आणि पात्रता निकषांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या फायद्यापासून वंचित राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने समजून घेऊन निकषांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. लोकशाहीत सरकारने जनतेशी संवाद साधून निर्णय घ्यावेत.”
मुख्यमंत्री व केंद्र नेत्यांशी चर्चेची तयारी
पवारांनी याबाबत मुख्यमंत्री आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. निकषांमध्ये बदल शक्य आहे का, यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
वादळी पावसाने नुकसान
याशिवाय, अलीकडील वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील केळी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पवारांनी म्हटलं, “नुकसानीचा प्राथमिक अहवाल आला असून, तज्ज्ञ पथकाने केलेल्या पाहणीचा अहवाल अभ्यासून पुढील कारवाई ठरविण्यात येईल.”
इंडिया आघाडी बैठक
दरम्यान, आज दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत पवार म्हणाले, “ही बैठक राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आहे. ही कोणत्याही मोठ्या निर्णयाची बैठक नसून, ‘जनरल रिव्ह्यू मीटिंग’ स्वरूपाची आहे. विरोधकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्यात येईल. या बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाल्या आहेत.”
