शहापूरजी पालमजी बांधकाम कंपनीच्या जॉयव्हिला गृहप्रकल्पाला दहा लाखाचा दंड

मांजरी Pune : नैसर्गिक ओढ्यात सांडपाणी सोडल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने शहापूरजी पालमजी बांधकाम कंपनीच्या मांजरी-शेवाळेवाडी येथील जॉयव्हिला गृहप्रकल्पाला दहा लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी त्याबाबतची नोटीस कंपनीला बजावली आहे. याशिवाय राडारोडा टाकून उपद्रव केल्याबद्दल पंधरा हजार रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दहा दिवसांपूर्वी शेवाळेवाडी- मांजरी भागाचा दौरा करून येथील समस्या जाणून घेतल्या. शेवाळेवाडी परिसराची पाहणी करीत असताना येथून वाहणाऱ्या नैसर्गिक ओढ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने त्याची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सहाय्यक आयुक्त ढवळे पाटील यांनी लागलीच बांधकाम कंपनीला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सांडपाणी नैसर्गिक ओढ्यात सोडण्याच्या प्रकाराने परिसरात चिकुनगुनिया, डेंग्यू , मलेरिया सारखे आजार व दुर्गंधीचा धोका निर्माण झाला असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे हे सांडपाणी त्वरित बंद करून दंडाची रक्कम भरण्याची सूचना कंपनीला देण्यात आली आहे.

“जॉयव्हिला या प्रकल्पाचे काम गेली चार-पाच वर्षांपासून सुरू आहे. रात्रंदिवस येथे काम सुरू असते. या ठिकाणी सुमारे दोन हजार परप्रांतीय कामगार काम करतात. ते मोठ्या प्रमाणात नशा करत गावाच्या परिसरातून फिरत असतात. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रकल्पातून केवळ सांडपाणी सोडले जाते असे नाही तर, अनेक वेळा प्रकल्पाचा राडारोडा इतरत्र टाकला जातो. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली गेली आहे. याबाबत वेळोवेळी मी पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त कार्यालयाला तक्रार केली आहे. मात्र, पुरेसी कारवाई होताना दिसत नाही. पालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घातल्याने आज या गृहप्रकल्पावर मोठी दंडात्मक कारवाई झाली आहे.’
राहुल शेवाळे – जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा
…………………………..