Pune पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील भूमिगत मेट्रो बोगद्यावर थेट बोअरवेल मारण्यात आल्याने बोगद्यावर खड्डा पडला आहे.
याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरात भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी निष्काळजीपणा समोर आला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रोच्या बोगद्यावर थेट बोअरवेल मारण्यात आल्याने बोगद्यात सुमारे ६ इंचांचा खड्डा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. १४ मार्च रोजी शुक्रवार पेठ परिसरात हा प्रकार घडला.
थेट बोगद्याच्या वरच बोअरवेल मारल्यामुळे बोगद्याचे नुकसान झाले असून त्या ठिकाणी पाणी गळतीही सुरू झाली आहे. या प्रकरणी पुणे मेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक शंतनु गोरात्रा यांनी तक्रार दाखल केली आहे. तर मूळ घरमालक धनंजय मोटे आणि जगताप नामक ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराखालून भूमिगत मेट्रो बोगदा जात असल्याची पूर्ण माहिती होती. तरीही आरोपींनी जाणीवपूर्वक आणि निष्काळजीपणे बोअरवेलचे काम केले. या कृत्यामुळे केवळ मेट्रोच्या बोगद्यालाच नव्हे तर नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. या घटनेत मेट्रोच्या मालमत्तेचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून राबवला जात असल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
