पुणे Pune News पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शहरातील अनेक ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला. दिवसभर हवेमध्ये उकाडा जाणवत होता. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. पण अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल होत आहे.
पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अगदी तासाभरात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. पुण्यातील बाणेरमध्ये असणाऱ्या सकाळनगर परिसरात या पावसामुळे सगळीकडेच पाणी पाणी झाले. याठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे बाणेर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या पाण्यातूनच कशी तरी वाट काढत वाहन चालक जात आहेत.
पुण्यात आज सकाळच्या सत्रात सूर्य देवाचे दर्शन झाल्यानंतर पुण्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह वरुण राजाने हजेरी लावली. पुणे शहरातील विविध परिसरात दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळाले. दुपारी ३ वाजल्यानंतर विजांच्या कडकडाटासह पुणे शहरातील पश्चिम भागात दमदार पावसाने बॅटिंग केली. औंध, बाणेर, पाषाण या भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं.
बाणेर परिसरातील सकाळनगर औंध रस्ता या परिसरात रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळाले. या पावसामुळे रस्त्यांचं नदीत रूपांतर झाल्यामुळे वाहनचालकांना मात्र याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. संध्याकाळची वेळ असल्यामुळे अनेक नोकरदार, विद्यार्थी हे घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना या रस्त्यांवरून कशी तरी वाट काढत जावे लागले. या पाण्यातून वाट काढताना अनेक दुचाकी देखील बंद पडल्या. बाणेर भागातील सकाळ नगर या परिसरातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणारा रस्ता तर वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे.
