Pune News: वाघोली, शेवाळवाडी, मांजरी परिसरातील असुविधा पाहुन संतप्त आयुक्तांची मोठी कारवाई;

Pune news वाघोलीत सोयीसुविधांचा आढावा घेताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना इथल्या नागरिकांनी घेराव घालत जाब विचारल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेची गांभीर्यानं दखल घेत आयुक्तांनी आज मोठा निर्णय घेतला.

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी केली. तसंच आज (ता. १८) शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात पाहणी केली यात अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांमधील सांडपाण्याचा प्रवाह, अतिक्रमण दिसल्याने हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांच्यासह दोन उप अभियंत्यांची तडकाफडकी बदली केली आहे. तर एका कनिष्ठ अभियंत्यासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नव्यानं महापालिकेत समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये प्राथमिक सुविधा जसे रस्ते, ड्रेनेज, कचरा यांच्या समस्या गंभीर असल्याचं आढळून आल्या आहेत. या भागातील नागरिकांशी संवाद साधताना वाघोलीत तर संतप्त झालेल्या नागरिकांनी आयुक्तांची गाडी अडवून त्यांना थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केला. शेवाळवाडी, मांजरीही प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी दिसून आली आहे. या भागात अस्वच्छता, रस्त्याने वाहणारे सांडपाणी, रस्त्यांना पडलेले खड्डे, गलिच्छ दुभाजक आणि पादचारी मार्ग, चौका-चौकातील अतिक्रमण, यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा निदर्शनास आले.

या सर्व समस्यांबाबत जेव्हा हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांना आयुक्तांनी विचारणा केली तर त्यांना याची समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळं आयुक्तांनी कडक भूमिका घेत ढवळे-पाटील यांना तातडीने या पदावरून हटवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक आणि मुकादम व्यवस्थित काम करत नसल्याने या तिघांचे थेट निलंबन केले आहे. यापुढे निष्काळजीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खात्यांतर्गत चौकशी, निलंबन केले जाईल. तसेच त्यांची बदली ही अकार्यकारी पदावर केली जाणार आहे.