Pune News : हिंजवडीत अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर खुनी हल्ला; पिझ्झा कटर, काटा-चमच्याने जबर मारहाण

Pune आयटी नगरी हिंजवडी परिसरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचे चिरंजीव अजिंक्य विनोदे यांच्यावर खुनी हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. हॉटेलचे भाडे मागण्यासाठी गेलेल्या अजिंक्य विनोदे यांना त्यांच्या भाडेकरूंनी १९ ऑक्टोबर, रविवारी दुपारी 3.15 च्या सुमारास पिझ्झा कटर, काटे चमचा आणि सिमेंट ब्लॉकने जबर मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी जुना जकात नाका परिसरातील ‘बेलबॉटम’ हॉटेलमध्ये ही घटना घडली. 5 ते 6 जणांनी अजिंक्य विनोदे यांच्यावर हल्ला केला. आरोपींमध्ये सुमीत सदाशिव, विकी तीपाले, अथर्व शिंदे, गौतम कांबळे, बंटी ठाकरे आणि समाधान यांची नावे समोर आली आहेत. यातील काही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तडीपारची कारवाई देखील झाली असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 109, 189, 191 सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.