डॉक्टर मला हस्तमैथुनाची ‘वाईट’ सवय लागली आहे, डॉक्टर हस्तमैथुनाने माझ्या शरीराची वाढ खुंटली आहे’, अशा प्रकारचे प्रश्न साधारणतः वर्तमानपत्रांमधल्या, मासिकांमधल्या प्रश्नोत्तरांमध्ये विचारले जात असल्याचं तुम्ही वाचलं असेल. कमी-अधिक फरकाने असे प्रश्न बहुतांश लोकांच्या मनामध्ये असतात.
सेक्स आणि त्यासंदर्भात बहुतांश गोष्टी ‘टॅबू’ म्हणजेच निषिद्ध, त्याज्य मानल्यामुळे हस्तमैथुनासह अनेक विषयांवरचे प्रश्न तसेच राहिले जातात.
ज्या वयात सेक्स आणि हस्तमैथुनाबद्दल कुतुहल जागृत होते, प्रश्न पडायला लागतात त्या वयापासूनच त्यांची उत्तरं देण्यासाठी कोणी उपलब्ध नसते. त्यामुळे अयोग्य व्यक्तींना प्रश्न विचारलं जाणं आणि चुकीची उत्तरं मिळण्याचा धोका जास्त असतो.
हस्तमैथुनाबद्दल उघड बोललं जात नसल्यामुळे चुकीच्या कल्पना, अफवा, भीती पसरवणारे विचार, अयोग्य मार्गदर्शन यांचा धोका जास्त असतो. त्यामुळे व्यक्तीचा गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त असते.
हस्तमैथुन म्हणजे काय?
हस्तमैथुन याचा अर्थ व्यक्ती आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून ‘शारीर’सुखाचा आनंद घेते. हस्तमैथुन करताना व्यक्ती काही कल्पना डोळ्यांसमोर आणून, शारीरसुखाचा विचार करून स्वतःला उत्तेजित करून वीर्यस्खलन करतात. प्रत्येक व्यक्ती ही प्रक्रीया वेगवेगळ्या पद्धतीने करते.
याला हस्तमैथुन अशी एक संज्ञा वापरली जात असली तरी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून वीर्यस्खलन करतात. त्यामुळे हस्तमैथुन संकल्पनेतील हाताचा वापर प्रत्येक व्यक्ती करेलच असे नाही.
समग्र कामजीवन’ पुस्तकाचे लेखक आणि लैंगिक समस्या तज्ज्ञ डॉ. राजन भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “हस्तमैथुन शब्दात जरी हात या शब्दाचा उल्लेख असला तरी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. स्वतः आनंद मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. ज्याप्रमाणे आपण हाताने खातो, चमच्याने खातो, काट्याने खातो तसंच स्वसुख मिळवण्याच्या पद्धतीही बदलू शकतात, पण त्याचं ध्येय वीर्यस्खलन होऊन स्वतः सुख मिळवणे हेच असतं. त्यामुळे आजकाल हस्तमैथुनाला (Masturbation) ला ‘सेल्फ प्लेजर’ असा शब्द वापरला जातो.”
हस्तमैथुन वाईट असतं का?
हस्तमैथुनामध्ये वाईट काहीही नाही. व्यक्तीने स्वतःच शारीरसुखाचा आनंद मिळवण्यात काहीही चूक नाही. ही अत्यंत खासगी, वैयक्तिक बाब आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करणं गुन्हा आहे.
हस्तमैथुनाचे तब्येतीवर वाईट परिणाम होतात? त्यामुळे प्रतिकाक्षमता कमी होते?
हस्तमैथुनामुळे कोणतेही शारीरिक नुकसान होत नाही. त्यामुळे प्रजननावर, वीर्यनिर्मितीवर परिणाम होत नाही किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं असे बदलही होत नाहीत.
हस्तमैथुनामुळे प्रतिकारक्षमतेवर आजिबात परिणाम होत नाही. कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा येत नाही. याबाबत ‘मिथ्स अँड फॅक्ट्स ऑफ मास्टरबेशन’ पुस्तकाचे लेखक आणि लैंगिक समस्या तज्ज्ञ डॉ. प्रसन्न गद्रे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, “कोरोनाच्या काळात हस्तमैथुन करावं का असाही प्रश्न विचारला जातो, तर कोरोनाच्या काळातही हस्तमैथुन करायला काहीही हरकत नाही. फक्त कोरोनामुळे ऑक्सिजनची पातळी खालावली असल्यास कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक ताण घेऊ नये. कोव्हिड होऊन गेल्यावर ऑक्सिजन पातळी योग्य असेल आणि दुसरा कोणताही त्रास नसेल तर हस्तमैथुन करायला हरकत नाही.
हस्तमैथुनामुळे रक्त कमी होतं का?
हस्तमैथुनातून वीर्य जातं आणि त्यामुळे रक्त कमी होतं व शेवटी प्रतिकारक्षमता कमी होते असा एक गैरसमज असतो त्यावर बोलताना डॉ. गद्रे म्हणाले, “पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी यांचं प्रमाण आणि वीर्य यांचा काहीही संबंध नाही. वीर्य गेल्यामुळे रक्त कमी होऊन प्रतिकारक्षमता कमी होते हा अत्यंत चुकीचा समज आहे. असं काहीही नसतं.”
ताणतणावामुळे प्रतिकारक्षमता कमी होते तो तणाव घालवण्यासाठी हस्तमैथुनाचा उपयोग होतो. “हस्तमैथुन करताना मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं द्रव्य स्रवतं. मेंदूमध्ये चांगली हार्मोन्स स्रवत असतात. हस्तमैथुनाच्या काळात हृद्याच्या रक्तवाहिन्या मोठ्या होतात. हस्तमैथुन हे शाप नसून वरदान आहे, वरदानामुळे प्रतिकारक्षमता कमी होत नाही”, असं डॉ. गद्रे सांगतात.
कितीहीवेळा हस्तमैथुन केलं तर चालतं का? किंवा रोज, आठवड्यातून, महिन्यातून कितीवेळा हस्तमैथुन केलं तर योग्य असे प्रश्न उपस्थित होतात.
हस्तमैथुन केलं नाही तर?
सध्याच्या काळात हस्तमैथुन करू नये, एखादा पूर्ण महिना हस्तमैथुन टाळून स्वतःच्या मनावर ताबा मिळवावा अशा प्रकारच्या मोहिमा इंटरनेटवर दिसून येतात.
हस्तमैथुन टाळल्यामुळे एकाग्र होता येतं, असे दावेही केले जातात. त्यामुळे याबाबतही लोकांच्या मनात शंका असतात.
हस्तमैथुन करू नये अशीही काही लोकांची धारणा असते त्याबद्दल डॉ. कोठारी म्हणाले होते, “जर तुम्ही दोन महिने चाललाच नाहीत आणि अचानक एके दिवशी दोन मैल चालायला लावलं तर तुमचे पाय दुखणारंच. दोन महिने तुम्ही मौन पाळलं आणि अचानक व्याख्यान द्यायला सांगितलं तर तुम्हाला बोलताना शब्द सापडणार नाहीत. आपल्या लैंगिक अवयवांबाबतीतही असंच आहे. कोणत्याही शास्त्रात हस्तमैथुन वाईट आहे असं लिहिलेलं नाही.”
हस्तमैथुनाबाबत काय पथ्यं पाळायची?
हस्तमैथुन नैसर्गिक प्रक्रिया असली तरी ती करताना काही नियमांचे पालन केलंच पाहिजे. ते सार्वजनिक ठिकाणी करणं बेकायदेशीर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
तसेच हस्तमैथुन करताना स्वच्छता पाळण्याची गरज आहे.
