Manoj Jarange Patil: आझाद मैदान फुल्ल, मोठी वाहतूक कोंडी; मनोज जरांगे मुंबईत पोहोचताच सरकारचा मोठा निर्णय

Pune मराठा आरक्षणसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarane Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केलं आहे. आज सकाळी मोठं शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली.

शासनाचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटण्याची शक्यता-

मनोज जरांगे यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषणामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या भागात गणपती भक्तांचीसुद्धा मोठी गर्दी असते. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणावर लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे तातडीने आज शासनाचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात नेमकं कोण कोण असणार, याबाबतही माहिती समोर आलेली नाही.

मानखुर्द, चेंबूरमध्ये जरांगेचं भव्य स्वागत करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलनस्थळ म्हणजे, आझाद मैदानही हाऊसफुल झालं आहे. आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे आझाद मैदानावर आदळतायत. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये. त्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर एवटलेल्या शेकडो मराठा आंदोलकांशी संवाद साधला. तसेच, यावेळी त्यांनी सर्व मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आणि शिस्त पाळण्याचं आवाहन केलं. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कुणी हलायचं नाही, असंही मनोज जरांगेंनी सांगितलं आहे.

आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे काय काय म्हणाले?

– कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नाही

– मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल टाल्याशिवाय इथून हालायचं नाही

– सरकारने आपल्याला सहकार्य केलंय, आता आपणही सरकारला सहकार्य करावं. समाजाचं नाव खाली जाईल, असं कुणी वागू नका.

– दारु पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका.

– मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही

– कोण काय सांगतंय, कोण राजकीय पोळी भाजतंय, त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करतंय का हे गांभीर्याने पाहा

– दोन तासात मुंबई मोकळी करुन द्या, पोलिसांना सहकार्य करा, एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या..