Pune Traffic : बाणेर, बालेवाडी, म्हाळुंग्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

पुणे – बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे येथील नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः राधा चौक आणि राष्ट्रीय महामार्गाखालील पुलाजवळ दररोज कोंडी होते.

समस्येवर उपाययोजना करण्यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.

चांदेरे यांनी पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यामध्ये म्हाळुंगे गावातून बाणेरकडे जाणाऱ्या ३६ मीटर रुंदीच्या रस्त्यावर दुपदरी पूल उभारणे, बालेवाडी गावातील २४ मीटर रुंदीच्या रस्त्यावर आणि म्हाळुंग्यातून येणाऱ्या ३० मीटर रुंदीच्या डीपी रस्त्यावर आणखी एक अंडरपास पूल उभारावा अशा मागणी केल्या आहेत.

या तीनही सुविधा उपलब्ध झाल्यास वाकडपासून सुसखिंडीपर्यंत वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि नागरिकांना दीर्घकालीन दिलासा मिळेल, असेही निवेदनात नमूद केले आहे. या समस्येचा सखोल अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांमार्फत या मागण्यांचा अभ्यास करून योग्य मार्ग शोधून काढण्याची तयारी दर्शवली आहे.