Pune महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाचा दहावीचा निकाल (SSC result) जाहीर होताच, विद्यार्थी आणि पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी (FYJC Online Admission) लगबग सुरु झाली असून, अकरावी प्रवेश प्रक्रियेला ८ मे पासून सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले असून, प्रवेशाच्या फेऱ्यांचे नियोजन नेमके कसे असेल, त्याविषयी जाणून घेऊया.
प्रवेश प्रक्रियेतील टप्पे
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची शून्य फेरी (Zero Round) शनिवार, ८ मे ते बुधवार, २० मे दरम्यान सुरु राहील. या प्रक्रियेत विद्यार्थी अर्जाचा पहिला भाग (भाग-१) भरू शकतील. तर, ११ मे ते १३ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना, त्यांच्या महाविद्यालयांच्या पसंतीक्रमानुसार अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरता येईल. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला किमान १ ते जास्तीत जास्त १० महाविद्यालये निवडण्याची मुभा असेल.
त्यानंतर १४ ते १५ मे दरम्यान, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामधील फेरबदल नोंदवण्यासाठी १६ मे हा दिवस देण्यात आला आहे. त्यानंतर २१ मे पासून पहिल्या फेरीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू होईल. २१ आणि २२ मे रोजी अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची शेवटची संधी असेल, ज्याची वेळ मर्यादा असेल सकाळी ६ वाजेपर्यंत.
त्यानंतर २३ मे ते २६ मे दरम्यान, महाविद्यालयांकडून प्रवेशांची यादी जाहीर केली जाईल आणि त्यानुसार २६ मे ते २८ मे दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत, त्यांना त्या त्या महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेशा निश्चीत करावा लागेल.
उपलब्ध माहितीनुसार, २९ मे रोजी दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागांची सविस्तर माहिती जाहीर केली जाईल आणि त्यानंतर ३० मे रोजी त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
केवळ ऑनलाइन प्रक्रिया
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे की, अकरावी इयत्तेच्या सर्व प्रवेश प्रक्रिया या केवळ ऑनलाइन पद्धतीनेच पूर्ण होतील. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सुमारे ७.७४ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग (भाग-१) भरला आहे. याव्यतिरिक्त कोटा प्रवेशाअंतर्गत व्यवस्थापन, अल्पसंख्यांक आणि संस्थांतर्गत कोट्यातील प्रवेशांची माहिती देखील विद्यार्थ्यांना याच काळात भरायची आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे जाहीर आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ वेळेत सुरु व्हावे, यासाठी शिक्षण महामंडळाकडून यंदा दहावी आणि बारावीचे निकाल वेळेवर लावण्यात आले. अकरावीचे वर्ग १ जुलैपासून सुरु करण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.
