Pune हिंजवडीत नाल्यांवरील अतिक्रमणे, मेट्रोच्या कामांसाठी बुजवलेल्या पावसाळी वाहिन्या (स्टॉर्म वॉटर लाइन) आणि महावितरणसह विविध कामांसाठी खोदलेले रस्ते असे चित्र पाहता पावसाळ्यात या वर्षीही हिंजवडी पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
‘एमआयडीसी’, ‘पीएमआरडीए’ आणि हिंजवडी ग्रामपंचायत यांच्या नियोजनाअभावी गेल्या वर्षी हिंजवडी आयटी पार्कमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या दुचाकी वाहून गेल्या. आयटी पार्क फेज दोन माण, गवारे मळा ते फेज तीन डोहलर कंपनीपर्यंत दोन्ही बाजूंचा रस्ता पाण्याने भरल्याने हा पूर्ण परिसर पाण्याखाली गेला. मात्र, यातून प्रशासनाने अजूनही काहीच बोध घेतलेला नाही. या घटनेला वर्ष होत आले, तरी अजूनही अनेक कामे अपूर्ण आहेत. बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणे तशीच आहेत. अन्य विकासकामांसाठीही रस्ते खोदलेले आहेत. त्यामुळे निचरा होण्यासाठी अडथळा होऊन रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
पावसाळी वाहिन्यांमध्ये राडारोडा
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या १२ स्थानकांवर जुलैपासून मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. अनेक मेट्रो स्थानकांखालून जाणाऱ्या पावसाळी वाहिन्या राडारोडा टाकून बुजवल्या आहेत. काही ठिकाणी त्या अस्तित्वात आहेत की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या गैरनियोजनामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे.
नाल्यांची कामे अपूर्ण
हिंजवडीत गेल्या वर्षी पूरसदृश परिस्थिती ही नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमणांमुळे निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर ‘एमआयडीसी’ प्रशासनाने नालेसफाई आणि रुंदीकरण हाती घेतले. पण, आता वर्ष होत आले तरी नाले रुंदीकरण, सफाई अपूर्ण आहे.
हिंजवडी आयटी पार्कमधील तीनही फेजमध्ये ‘एमआयडीसी’कडून नालेसफाई, नाले दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.
– राजेंद्र तोतला, कार्यकारी अभियंता, ‘एमआयडीसी’
पावसाळ्यात पाणी साचून हिंजवडी आयटी पार्क पुन्हा तुंबू नये, यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. पाणी साचू नये यासाठी नाले मोकळे केले आहेत.
– अभिजित चौधरी, आयुक्त, ‘पीएमआरडीए’
समन्वयाचा अभाव
राजीव गांधी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पार्कचे नियोजन प्रामुख्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘पीएमआरडीए’, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे ‘एमआयडीसी’ यासह स्थानिक ग्रामपंचायत यांच्याकडे आहे. हिंजवडीच्या पुढचा काही रहिवासी भाग हा पिंपरी चिंचवड महापालिका, तर अलिकडचा बाणेर परिसर पुणे महापालिका हद्दीत येतो. गेल्या वर्षी पूरसदृश स्थितीनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रशासनातील सर्व संबंधित यंत्रणांनी दोनदा या परिसराची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन प्रशासनाला विविध सूचना दिल्या होत्या. ‘एमआयडीसी’, ग्रामपंचायत, ‘एनएचएआय’ आणि ‘पीएमआरडीए’ यांच्यात समन्वय ठेवण्याची जबाबदारी ‘पीएमआरडीए’चे तत्कालीन आयुक्त योगेश म्हसे यांच्यावर सोपवली होती. सुरुवातीला म्हसे यांनी काही बैठका घेऊन संबंधितांना कार्यादेश दिले. पण, त्यानंतर ना समन्वय बैठक झाली, ना कामाचा आढावा घेतला गेला.
