Pune News – मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार
समाजमाध्यमांवरील बनावट जाहिरातींपासून सावध राहण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी शासनाने कोणत्याही अशासकीय व्यक्ती किंवा संस्थेला प्राधिकृत केलेले नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या योजनेच्या नावाखाली काही कंपन्यांकडून नागरिकांची कागदपत्रे जमा केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अर्जदारांनी सतर्क राहण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाने ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेला मंजुरी दिली आहे. ग्रामीण भागात पशुपालनाच्या माध्यमातून उद्योजकता निर्माण करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळ गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुक्कुट पक्षी आणि वराह यांसाठी अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रणालीद्वारे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
अर्जदारांना सुलभतेने अर्ज करता यावा, यासाठी सातबारा उतारा, रेशनकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र यांसारखी संबंधित कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महा-डीबीटी पोर्टलवरून अर्ज करता येणार
या योजनेसाठी शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर केवळ आधार क्रमांक किंवा महाआयडी क्रमांकाच्या आधारे अर्ज करता येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
अर्ज प्रक्रियेबाबत काही अडचण किंवा शंका असल्यास नागरिकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा संबंधित कार्यालयात संपर्क साधावा. तसेच १९६२ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
