Pune News – पुणे महानगरपालिकेचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने व पक्ष नेतृत्वाने जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.
निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये मात्र अनेक माजी नगरसेवकांची चिंता वाढली आहे. भाजपच्या सुमारे 35 ते 40 माजी नगरसेवकांची यावेळी उमेदवारी कापली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. Municipal Corporation elections
2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले होते. मात्र यावेळी त्यातील 35 ते 40 नगरसेवकांची तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे बदललेली प्रभागरचना. नव्या प्रभागरचनेत अनेक जुने प्रभाग एकमेकांत मिसळले गेले आहेत. त्यामुळे काही माजी नगरसेवकांचे प्रभाग बदलले असून त्यांचे राजकीय गणित बिघडले आहे.
याशिवाय प्रभागांतील आरक्षण सोडतीचा मोठा फटका माजी नगरसेवकांना बसला आहे. महिला, इतर मागासवर्ग महिला तसेच अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी असलेल्या आरक्षणामुळे अनेकांची उमेदवारी अडचणीत आली आहे. काही माजी नगरसेवकांवर कामगिरीबाबत नाराजीही असल्याचे बोलले जात आहे.
