pune कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) अर्थात ‘सीसीआय’ने चालू कापूस हंगामात खरेदी केलेल्या कापसाची विक्री सुरू केली आहे. या निर्णयामुळे कापूस बाजारात नव्या हालचालींना सुरुवात झाली असून, आगामी काळात बाजारभावांवर सीसीआयच्या विक्री दरांचा मोठा प्रभाव राहणार आहे.
सरकारी यंत्रणेकडून होणाऱ्या या विक्रीमुळे बाजाराला हमीभावाचा आधार मिळत असला, तरी भाववाढीच्या अपेक्षांना सध्या थोडा ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कापसाच्या दरात चांगली सुधारणा दिसून आली होती. अनेक बाजारांत कापूस हमीभावाच्या पातळीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुढील काळात दर आणखी वाढतील, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, सीसीआयने १५ जानेवारी रोजी अचानक निर्णय घेत, १९ तारखेपासून चालू हंगामातील कापूस विक्री सुरू करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे बाजारातील दरवाढीचा वेग काहीसा मंदावला.सीसीआयच्या विक्री निर्णयानंतर कापसाच्या कमाल दरात थोडी नरमाई दिसून आली आहे.
तरीही सरासरी दरपातळी टिकून असल्याचे बाजारातील जाणकार सांगतात. त्यामुळे सध्या तरी कापूस बाजार पूर्णपणे कोसळलेला नसून, तो स्थिर अवस्थेत असल्याचे चित्र आहे. सीसीआय कापूस विक्रीसाठी कोणता दर जाहीर करते, याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले होते.
जर सीसीआयने नव्या कापसाचा दर जुन्या साठ्यातील कापसाप्रमाणे कमी ठेवला असता, तर बाजारभावांवर मोठा नकारात्मक परिणाम झाला असता. मात्र, सीसीआयने गुणवत्तेनुसार कापसाचा विक्री दर प्रति खंडी ५५ हजार ते ५७ हजार रुपये निश्चित केला. हा दर मागील हंगामातील कापसाच्या तुलनेत सुमारे ३ हजार रुपयांनी अधिक आहे. मंगळवारीही सीसीआयने हेच दर कायम ठेवल्यामुळे बाजारभावांना आधार मिळाला आहे.
गेल्या हंगामात सीसीआयने देशभरातून सुमारे १०० लाख गाठी कापसाची खरेदी केली होती. त्यापैकी जवळपास ९९ टक्के कापूस विक्रीस गेला आहे. चालू हंगामात आतापर्यंत सीसीआयने ८२ लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून १९ लाख गाठी, तर तेलंगणातून २८ लाख गाठी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सध्या हा कापूस सीसीआयकडून टप्प्याटप्प्याने बाजारात विकला जात आहे.
सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावाच्या आसपास असल्यामुळे सीसीआयची नवीन खरेदी मोठ्या प्रमाणात थांबलेली आहे. देशातील प्रमुख बाजारांत कापसाचा दर प्रति क्विंटल ७,९०० ते ८,२०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर कापूस खंडीचे दर ५५ ते ५६ हजार रुपयांपर्यंत आहेत. आयात कापसाचे दरही याच पातळीवर आहेत.आगामी काही दिवसांत कापूस बाजारातील हालचाली सीसीआयच्या विक्री धोरणावर अवलंबून राहणार आहेत. सीसीआय जर दर स्थिर ठेवत राहिली, तर बाजारही स्थिर राहण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योगक्षेत्राने पुढील काही दिवस सावध भूमिका घेणे गरजेचे ठरणार आहे.
