शनिवार वाड्यासमोर खुली डिबेट घ्या! भाजपच्या उमेदवारांना जयंत पाटलांचे थेट आव्हान

पुणे : भाजपच्या उमेदवारांसोबत शनिवार वाड्यासमोर खुली चर्चा (डिबेट) आयोजित करा, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. उमेदवारांची क्षमता, भूमिका आणि कामगिरी मतदारांसमोर स्पष्ट व्हावी, यासाठी सर्व उमेदवारांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, “शनिवार वाड्यासमोर चार खुर्च्या आणि दोन माईक लावा. भाजप पुरस्कृत दोन उमेदवार आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार समोरासमोर बसवा. टीव्ही कॅमेऱ्यांसमोर खुली चर्चा होऊ द्या. कोणत्या उमेदवाराची काय क्षमता आहे, हे मतदारांना स्पष्टपणे समजू द्या.”

प्रा. जयंत आसगावकर यांच्या कामाचा उल्लेख

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षांत विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले असून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम केले आहे, असे पाटील यांनी नमूद केले. खुल्या चर्चेत आमचे उमेदवार विरोधकांच्या मुद्द्यांना उत्तर देतील आणि मतदारांसमोर आपली भूमिका स्पष्ट करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मतदारांसमोर उमेदवारांच्या कामाची चर्चा व्हावी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची भूमिका, कामगिरी आणि शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांवरील त्यांची भूमिका यावर खुली चर्चा व्हावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. या आव्हानामुळे पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारांमधील खुल्या चर्चेचा मुद्दा चर्चेत आला आहे.