हिंजवडीच्या विकासासाठी आयटीयन्स-स्थानिकांचा मूक मोर्चा; सरकारविरोधात उठवला आवाज!

Pune हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कसह परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटत नसल्याने आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवासी रविवारी रस्त्यावर उतरले. त्यांचा स्मार्ट आयटी सिटी संकल्प मूक मोर्चा सध्या आयटी पार्कमध्ये सुरू असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने हिंजवडीतील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेचा प्रश्न सरकार गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या आंदोलनात स्थानिक शेतकरी, रहिवासी, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन माण, हिंजवडी-माण-मारूंजी इन्फ्रा फोरम, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड को-ऑप हाऊसिंग फेडरेशन, मुळशी को-ऑप हाऊसिंग फेडरेशन या संघटना सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाची सुरूवात हिंजवडीतील इन्फोसिस सर्कलपासून झाली. हा मोर्चा शिवाजी चौकमार्गे पुन्हा इन्फोसिस सर्कल चौकात येणार असून तिथे या मोर्चाची सांगता होणार आहे. शांततामय पद्धतीने हे आंदोलन सुरु असून, त्यात आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक फलक हातात घेऊन आपल्या मागण्या मांडत आहेत.

हिंजवडी, माण आणि मारूंजी परिसरात आयटी पार्कचा विस्तार झालेला आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण, औद्योगिक विस्तार आणि लोकसंख्या वाढ झाली आहे. मात्र, रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणी पुरवठा, नागरी सुविधांमध्ये वाढ झालेली नाही. याचबरोबर हा परिसर अनेक शासकीय यंत्रणांमध्ये विभागले गेला आहे. मात्र, या यंत्रणांत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे नागरी विकासाची कामे होत नसल्याचे चित्र आहे. याबाबत आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला, असे आंदोलकांनी सांगितले.

हिंजवडी, माण, मारूंजी परिसरात दररोज लाखो नागरिक, आयटी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. खराब रस्ते आणि पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. शासकीय यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालमर्यादा निश्चित करून शासनाने हे प्रश्न सोडवावेत, अशी आमची मागणी आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.