भारताच्या जीडीपी वाढीवर रघुराम राजन यांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह; म्हणाले,

Pune आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या जीडीपी वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढत असेल, तर तरुणांसाठी पुरेशा नोकऱ्या का निर्माण होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराबाबत त्यांना शंका आहे. इतक्या वेगाने होणाऱ्या आर्थिक वाढीबाबत काही खऱ्याखुऱ्या चिंता असल्याचंही त्यांनी नमूद केले.

अर्थव्यवस्था खरोखरच इतक्या वेगानं वाढत असेल, तर अधिक नोकऱ्या का निर्माण होत नाहीत आणि अधिक गुंतवणूक का होत नाही, असा प्रश्नही राजन यांनी या मुलाखतीदरम्यान केला.

राजन यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

“हे वाढीचे आकडे खरे आहेत का? जर वाढीचे आकडे खरे नसतील, तर मोठ्या अर्थव्यवस्थेबाबतही शंका निर्माण होते. काही अशा विसंगती आहेत ज्यांची चिंता करणं गरजेचं आहे. जसे की आपण इतक्या वेगानं वाढत असू, तर अधिक नोकऱ्या का निर्माण होत नाहीत? आणि चांगल्या नोकऱ्या का नाहीत? गुंतवणूक का होत नाही? आपले उद्योगपती गुंतवणूक करण्यास इतके कचरत का आहेत? एफडीआय मोठ्या प्रमाणावर का येत नाही? आपण आकड्यांशी बराच काळ खेळू शकतो आणि काहीतरी मत बनवू शकतो,” असं राजन म्हणाले.

याशिवाय, सरकार अधिक नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आवश्यक पावलं उचलत आहे का, असाही प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, आपली उपस्थिती असलेल्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर राहण्यासाठी कोणते उपाय केले जात आहेत, असंही त्यांनी विचारलं.

“आपण हा धोका पत्करत आहोत”

“या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ‘नाही’ असेल, तर मला वाटतं की आपल्यासमोर एक मूलभूत समस्या आहे. कारण सध्याचा काळ हा आपल्यासाठी पॉप्युलेशन डिविडेंडचा काळ आहे. जर आपण सर्वांसाठी पुरेशा नोकऱ्या निर्माण करत नसू, तर आपण हा ‘पॉप्युलेशन डिविडेंड’ गमावण्याचा धोका पत्करत आहोत,” असंही राजन म्हणाले.

सोशल मीडियावर ती क्लिप व्हायरल झाल्यानंतर लगेचच, ‘आरिन कॅपिटल’चे अध्यक्ष आणि इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आणि स्वार्थापोटी नोकऱ्यांबाबत एक चुकीचा समज पसरवला जात असल्याचं म्हटलं. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ईपीएफओचे नोकऱ्यांचे आकडे पुन्हा सुरू करावेत, असं आवाहन पै यांनी पंतप्रधान मोदींना केलं.