Pune Traffic Update: पुण्यातील ‘ट्रॅफिक’बाबत मोठी अपडेट! ‘मिसिंग रोड’च्या कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे

Pune देशातील सर्वात जास्त वाहतूककोंडी असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा नंबर लागतो. वाहतुकीमुळे नागरिक कायम त्रस्त असतात. शहरातील मिसिंग रोडच्या कामांबाबत आता प्रशासकीय पातळीवरुन हालचाली सुरु झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील मिसिंग रोडच्या अनुषंगाने बैठक झाली. पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध ठिकाणी आवश्यक असलेल्या ‘मिसिंग रोड’च्या कामांचा आढावा घेऊन प्रलंबित भूसंपादन व अन्य अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त बैठकीला हजर होते. बैठकीत शहरातील विविध मिसिंग रोडची सद्यस्थिती, आवश्यक भूसंपादन, उपलब्ध जागा, संबंधित मालमत्ता, रस्ते जोडणीसाठी आवश्यक कार्यवाही तसेच प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विविध भागांतील रस्ते जोडणी अधिक सक्षम करण्यासाठी मिसिंग रोडची कामे महत्त्वाची आहेत. त्यामुळे संबंधित रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक भूसंपादन व प्रशासकीय कार्यवाहीला गती देऊन प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.