मुळशी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; विविध मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन

मुंबई | प्रतिनिधी

मुळशी तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित मागण्यांसाठी आज मुंबई येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या समवेत भेट घेण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री. शिवाजी बुचडे पाटील, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य श्री. अमित कंधारे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

मुळशी तालुक्याला टाटा धरणातून दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच ५२ गावांच्या विकासासह तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, या मागण्यांसाठी सेनापती श्री. अमित कंधारे यांनी उपोषण केले होते. या मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी वेळ दिली होती. यावेळी तालुक्यातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच माण गावातील एमआयडीसीचे शिक्के कमी करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. या प्रश्नामुळे स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून देत नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

यासोबतच पीएमआरडीएकडून मुळशी तालुक्यातील रस्त्यांसाठी आवश्यक निधी मंजूर करावा, तसेच तालुक्यातील इतर विकासकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुळशी तालुक्यातील सर्व प्रश्नांची सकारात्मक दखल घेत, लवकरच संबंधित अधिकारी व विभागांसोबत बैठक घेऊन प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि तालुक्यातील प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.