भाजपच्या तिरंगा रॅलीला २० हजार दुचाकींचे लक्ष्य; पुण्यात ट्राफिक कोंडीची भीती

Pune स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात उद्या मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तब्बल १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, या रॅलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी टीका केली असून, मोठ्या संख्येने दुचाकी रस्त्यावर आणल्यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बालवडकर म्हणाले की, एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना इंधनाची बचत करण्यासाठी कमीत कमी वाहनांचा वापर करण्याचे आवाहन करीत आहेत. दुसरीकडे, भाजपकडूनच हजारो दुचाकींचा सहभाग असलेली रॅली आयोजित केली जात आहे.

दरम्यान, तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान पुणे वाहतूक पोलिसांसमोर राहणार आहे. रॅलीच्या मार्गावर वाहतूक वळविणे, नागरिकांना होणारा त्रास कमी करणे आणि आपत्कालीन सेवांना मार्ग उपलब्ध करून देणे यासाठी प्रशासनाला विशेष नियोजन करावे लागणार आहे.