पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट;

Pune राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

या महत्त्वाच्या भेटीनंतर फूट पडलेले राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या आणि विलीनीकरणाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात प्रचंड जोर धरला आहे.

शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीनंतर चक्रे फिरली?

विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अवघ्या काही दिवसांतच अजित पवार गटातील बड्या नेत्यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बैठकीचा अधिकृत अजेंडा किंवा तपशील दोन्ही बाजूंनी जाहीर करण्यात आलेला नसला, तरी या दोन्ही भेटींचा परस्परांशी संबंध जोडला जात असून पक्षात एकत्रीकरणाचे प्रयत्न वेगाने सुरू असल्याचे मानले जात आहे.

पडद्यामागून संवाद सुरूच?

मागील काही आठवड्यांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमध्ये पडद्यामागून चर्चा सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. जरी दोन्ही बाजूंचे नेते जाहीरपणे या चर्चा फेटाळून लावत असले, तरी पक्षांतर्गत पातळीवर जोडणीचे प्रयत्न पूर्णपणे थांबलेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी मंदावलेली विलीनीकरणाची प्रक्रिया या नव्या भेटीमुळे पुन्हा एकदा रुळावर आल्याचे चित्र आहे.

भाजपची ‘एकसंध राष्ट्रवादी’ला पसंती?

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या गटांशी स्वतंत्रपणे जुळवून घेण्यापेक्षा एकसंध राष्ट्रवादीशी संवाद साधणे भाजपसाठी अधिक सोयीचे ठरेल, असा सूर भाजप नेतृत्वाचा आहे.

दोन्ही गटांतील प्रमुख नेते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधील सातत्याने होणाऱ्या बैठकांनंतर विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही गटाने अधिकृतपणे अंतिम शिक्कामोर्तब केलेले नाही.