सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांनाही स्वखर्चातून रेनकोट वाटप
मुळशी प्रतिनिधी | समाजसेवेचा वसा जपत मुळशी पंचायत समितीच्या सभापती मा. सौ. मंदाताई बाबाजी शेळके यांनी स्वखर्चातून मुळशी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाला टी-शर्टचे वितरण केले. नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना आणि आपत्कालीन परिस्थितीत जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या स्वयंसेवकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
याचबरोबर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकरी बांधवांची गैरसोय होऊ नये आणि पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे, या सामाजिक भावनेतून स्वखर्चाने रेनकोटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वारकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला.
आपत्ती व्यवस्थापन पथक आणि वारकरी बांधव या समाजसेवेच्या दोन महत्त्वाच्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. समाजातील गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी लोकसेवा असल्याचे मत सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य, विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमाबद्दल उपस्थितांनी सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
