राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जालिंदर कामठे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Pune News पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जालिंदर कामठे यांचे (NCP News) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून राजकीय वर्तुळात त्यांची मोठी ओळख होती.

त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

काल सायंकाळी नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर जालिंदर कामठे आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले होते. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे (NCP News) ते सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी उठतात, परंतु आज सकाळी सहा वाजून गेले तरी ते उठले नाहीत. बराच वेळ झाला तरी खोलीतून काहीच हालचाल होत नसल्याने कुटुंबीयांना संशय आला.

अखेर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास काळजीपोटी कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला आणि त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जालिंदर कामठे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. हवेली तालुक्यातील कोंढवा हे त्यांचे मूळ गाव असून आज सायंकाळी कोंढवा स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

जालिंदर कामठे यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षातून आणि तळागाळातून सुरू झाला होता. पुणे शहरातील विद्यार्थी संघटना आणि पुढे युवक काँग्रेसच्या चळवळीतून तयार झालेले ते एक धडाडीचे कार्यकर्ते (NCP News) होते. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आक्रमक आणि कार्यतत्पर नेते म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील विद्यार्थी चळवळी तसेच पुणे विद्यापीठावर झालेली अनेक आंदोलने आजही राजकीय वर्तुळात आठवली जातात.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील हे त्यांच्या गुरुस्थानी होते. वसंतदादांबद्दल असलेल्या आदरापोटी त्यांनी कोंढवा येथे त्यांच्या नावाने एक शाळा देखील सुरू केली होती.

कामठे कुटुंबाची पार्श्वभूमीही मोठी राजकीय राहिलेली आहे. त्यांच्या पत्नी जयश्री कामठे या १९९२ ते १९९८ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्या होत्या आणि त्यांनी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. त्यानंतर जालिंदर कामठे स्वतः १९९७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि पुढे १९९९ ते २००२ या कालावधीत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अत्यंत यशस्वीपणे सांभाळले.