Pune पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने चालू आर्थिक वर्षात सवलत कालावधीत १ हजार २३० कोटी २७ लाखांचे ‘रेकॉर्डब्रेक’ करवसुली झाल्याचे चित्र उभे केले. मात्र गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्षात १ हजार २४६ कोटी ९० लाखांचे उत्पन्न मिळाले होते.
त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सवलत कालावधीत मिळकतकरात तब्बल १६ कोटी ६३ रुपयांची घट झाली आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागाने केवळ सोयीस्कर आकडेवारीचा खेळ करून पुणेकरांची आणि पालिका प्रशासनाची दिशाभूल केली आहे. विशेष म्हणजे ८० हजार मिळकती वाढूनही उत्पन्नात घट झाली आहे.
पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षात पहिल्या दोन महिन्यात म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत मिळकतकर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ५ ते १० टक्के सवलत जाहीर केली होती. गेल्या वर्षी महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना थकीत कर वसुलीसाठी ‘अभय योजना’ राबवण्यात आली होती. या योजनेतून पालिकेला सुमारे ९०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला असला, तरी यंदा मात्र नियमित वसुलीला याचा मोठा फटका बसला आहे. मिळकतकर सवलतीच्या मुदतीत केवळ ६ लाख ५८ हजार मिळकतधारकांनीच कर भरला आहे. त्यातून पालिकेला १ हजार २३० कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यात नागरिकांनी ऑनलाइन / डिजिटल प्रणालीद्वारे ७७० कोटी ११ लाख भरले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२५-२६ या आर्थिक वर्षात याच कालावधीत पालिकेने १ हजार २४६ कोटी ९० रुपयांची वसुली केली होती. म्हणजेच यंदा पालिकेला मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल १६ कोटी ६३ लाख रुपये कमी महसूल मिळाला आहे.
८० हजार मिळकती वाढूनही वसुलीत घट
पुणे शहरात तब्बल ८० हजारांहून अधिक नवीन मिळकतींची भर पडली आहे. या नवीन मिळकतींवर कर आकारणी करूनही प्रत्यक्ष करवसुली वाढण्याऐवजी घटली आहे. त्यामुळे मिळकतकर विभागाने सोयीस्कर आकडेवारीचा खेळ करून उत्पन्न वाढल्याचे दर्शवून स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आकडेवारीची मोडतोड करून महसूल वाढल्याचा खोटा आव
मिळकतकर विभागाने सवलतीत यंदा विक्रमी कर गोळा झाल्याचा दावा करण्यासाठी १ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीतील वसुली गृहीत धरली. त्याची तुलना मागील वर्षीच्या १ एप्रिल ते ३१ मे २०२५ या कालावधीशी केली. परंतु, गेल्या वर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निवासी मिळकतकराच्या ४० टक्के सवलतीबाबत मोठा गोंधळ उडाला होता.हा गोंधळ दुर करताना बिले पाठविण्यास उशिर झाला. त्यामुळे पालिकेने मिळकत करात सवलत मिळण्याचा कालावधी १ मे ते ७ जुलै २०२५ असा वाढवून दिला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या सवलत कालावधीत पालिकेला १ हजार २४६ कोटी ९० लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा सवलत कालावधीत कोणताही बदल नसतानाही प्रत्यक्ष वसुली कमी झाली आहे. मिळकतकर विभाग केवळ तांत्रिक आकडेवारीची मोडतोड करून महसूल वाढल्याचा खोटा आव आणला आहे.
अद्यापही साडेआठ लाख मिळकतधारकांनी अद्याप कर भरलेला नाही
महापालिकेने यंदा शहरातील १५ लाखांहून अधिक मिळकतधारकांना कराची बिले पाठवली होती. मात्र, सवलत मिळण्याच्या मुदतीत केवळ ६ लाख ५८ हजार मिळकतधारकांनीच कर भरला आहे. अद्यापही साडेआठ लाख मिळकतधारकांनी अद्याप कर भरलेला नाही. प्रशासन सातत्याने अभय योजना राबवत असल्याने थकबाकीदारांची संख्या वाढली आहे.
