Pune पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) वारंवार नोटीस बजावूनही बांधकाम न थांबवल्याने कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका विकासकाविरोधात अखेर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवत अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवल्याचा आरोप संबंधित विकासकावर करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन व निष्कासन विभागातील शाखा अभियंता (कंत्राटी) प्रणव दिलीप डेंगळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उद्योजक हेमंत हाडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचनसह पूर्व हवेली परिसरात शेकडो अनधिकृत बांधकामे आणि मोठे प्रकल्प सुरू असल्याची चर्चा असून, त्या विकासकांवरही पीएमआरडीए कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील गट क्रमांक ४७७ मधील बांधकामाबाबत अशोक दिनकर खोले यांनी पीएमआरडीएकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २७ मार्च २०२६ रोजी अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी केली असता संबंधित ठिकाणी हेमंत हाडके यांच्या मालकीचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून ६ एप्रिल २०२६ रोजी बांधकाम तात्काळ थांबविण्याची नोटीस बजावण्यात आली होती.
परवानगी प्राप्त होईपर्यंत कोणतेही पुढील बांधकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तसेच आदेशाचे पालन न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला होता. मात्र संबंधित विकासक हेमंत हाडके यांनी ना आवश्यक कागदपत्रे सादर केली, ना बांधकाम थांबवले. उलट नोटीस आणि सुनावणी प्रक्रिया सुरू असतानाही बांधकाम सुरूच ठेवल्याचे पीएमआरडीएच्या निदर्शनास आले.
दरम्यान, पीएमआरडीएचे पदनिर्देशित अधिकारी तथा तहसीलदार रविंद्र रांजणे यांच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. २७ मार्च ते २ जून २०२६ या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याचा ठपका ठेवत हेमंत हाडके यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
