खडकवासल्यात शिवसेनेची मोठी संघटनात्मक नियुक्ती; शिवाजीराव मते पाटील विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुणे शहरातील संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खडकवासला विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी शिवाजीराव मते पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुखपत्र सामना मध्ये या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

शिवाजीराव मते पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून, त्यानंतर त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३३ मधून त्यांनी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

नियुक्तीनंतर बोलताना शिवाजीराव मते पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले. “माझ्यासारख्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाने ताकद दिली आहे. आगामी काळात खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न शिवसेना स्टाईलने मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच लवकरच संघटनात्मक नियुक्त्याही केल्या जातील,” असे त्यांनी सांगितले.

या नियुक्तीनंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खडकवासला मतदारसंघातील जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटना अधिक मजबूत करणे आणि पक्षाची ताकद वाढवणे यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवाजीराव मते पाटील यांनी यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्ष प्रवक्त्या सुषमा अंधारे, पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर, गजानन थरकुडे, शहरप्रमुख वसंत मोरे, संजय मोरे, मनीषा उद्रे-दिवेकर, जिल्हाप्रमुख प्रकाश गोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मते पाटील आणि जिल्हा उपप्रमुख महेश मते यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक मजबूत करून जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.