बंद पडलेल्या कंपनीचे महापौरांसह सहा जण होणार संचालक !

Pune news पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळावर महानगरपालिकेच्या मुख्य सभेत एका सदस्याची शिफारस केली जाणार आहे. तसेच, निधीअभावी बंद पडलेल्या ‘स्मार्ट सिटी कंपनी’वरदेखील संचालक नियुक्त केले जाणार आहेत.

या दोन्ही कंपनींच्या संचालकपदांवर कोणाला संधी दिली जाणार, याचा निर्णय उद्या (बुधवारी) १८ मार्चला होणार आहे.

पुणे महापालिकेच्या मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत ही निवड केली जाणार आहे. तसेच, या मुख्य सभेत महापालिकेत १० स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणादेखील होणार आहे. ‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळावर तसेच ‘स्मार्ट सिटी कंपनी’वर संचालक म्हणून काम करण्याची संधी महापालिकेत सत्ताधारी असलेला भारतीय जनता पक्ष कोणाला देणार, या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

चार वर्षे महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्यापासून संचालकपदांची पदे रिक्त होती. महापालिकेची निवडणूक होऊन महापौर, उपमहापौरांसह, विरोधी पक्षनेते, सभागृह नेता या पदांवर नियुक्ती करण्यात आल्याने पीएमपी तसेच स्मार्ट सिटी कंपनीवर संचालक मंडळातील रिक्त असलेली पदे भरली जाणार आहेत.

संचालक नियुक्तीचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे. ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाची कायमस्वरूपी रचना ही शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा एका सदस्याची शिफारस संचालकपदासाठी करते. मुख्य सभेने संचालकपदासाठी सदस्याचे नाव कळवावे, असे पत्र पीएमपी प्रशासनाने महापालिका प्रशासनाला दिले आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या ‘पुणे स्मार्ट सिटी कंपनी’ने देखील महापालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. ‘स्मार्ट सिटी’साठी पुणे महानगरपालिकेने ६ संचालक नामनिर्देशित करणे आवश्यक आहे. यामध्ये महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते यांच्यासह दोन सभासदांची संचालक म्हणून नियुक्ती केली जाते.

पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरीक्त नियुक्त केले जाणारे हे दोन सदस्य संबंधित पदाधिकारी ज्या राजकीय पक्षांचे आहेत, ते वगळून राष्ट्रीय, राज्य मान्यताप्राप्त दोन राजकीय पक्षांच्या संख्याबळाच्या उतरत्या क्रमानुसार निवडले जातात. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’च्या संचालकपदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सदस्यांना संधी मिळणार असल्याचे निश्चित आहे.