Manoj Jarange Patil: डोक्यावर भगवा गमछा गुंडाळला, खाली बाज टाकली, 40 डिग्रीच्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण सुरु;

Pune मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या तारीख व वेळेनुसार आज (३० मे) सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी रोडवरील शेतात बाज टाकून भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे

पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.

‘आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘जितेंगे लढेंगे, हम सब जरांगे’, अशा घोषणा मराठा आरक्षण समर्थकांकडून उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर देण्यात आल्या.

राधाकृष्ण विखे-पाटलांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (२९ मे) राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून जरांगे पाटील यांनी केलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

विखे पाटील आंदोलन स्थळी जाणार?

याच अनुषंगाने काही वेळातच कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सरकारच्या आश्वासनाचे लेखी पत्र घेऊन पुन्हा उपोषणस्थळी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सरकारच्या पत्रात नेमके कोणते आश्वासन दिले जाते आणि त्यावर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.