Pune पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार आणि सुप्रीया सुळे यांनी फोनवरून अर्ज भरण्याच्या सूचना दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
तसेच शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली म्हणजे मताच गणित त्यांनी ठरवले असणार, असा विश्वास श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काॅग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपमधील या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून अद्याप या जागेवरील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
तर भाजपकडूनही पुण्यातील जागेवर दावा करण्यात आलेला असला तरी मतांची आकडेवारी पाहता राष्ट्रवादीचे मतदार जास्त असल्याने तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने त्यांनाच ही जागा मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
