Pune बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला आहे.
त्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे. मी सकाळीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता, त्या वेळी ते सकारात्मक होते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी सकाळीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे होत असलेल्या पोटनिवडणुकीत आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या आहेत. आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की, एखाद्या नेत्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक आपण बिनविरोध करतो. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाने त्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला नव्हता. त्याच अनुषंगाने आज मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना फोन करून विनंती केली, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, सकाळी चर्चा करताना हर्षवर्धन सपकाळ हे मला सकारात्मक वाटले. पण, आता काय निर्णय झाला आहे, याबाबत मला अजून कल्पना नाही. कारण मी एका कार्यक्रमात होतो.
