ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे पुण्यात पूरस्थिती; करदात्यांचा पैसा वाया – नगरसेवक सुहास टिंगरे

ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण; प्रशासनाकडून करदात्यांचा पैसा वाया – नगरसेवक सुहास टिंगरे

सभागृहाची दिशाभूल; कंपनीला नेमकं वाचवतोय कोण?

पुणे प्रतिनिधी – : कोट्यवधी रुपये खर्च करून गाजावाजा करत मिरवत असलेल्या ‘स्मार्ट सिटी’ पुण्याची सोमवारी (दि. ३०) अवघ्या काही मिनिटांच्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा पोलखोल केली. दुपारनंतर झालेल्या अचानक आणि जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले, वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी पुणेकरांना अक्षरशः पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला.

संपूर्ण पुणे शहरात काहीच मिनिटे आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. यामुळे मार्च संपला तरीही पावसाळापूर्व साफसफाईला सुरुवात न करणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. ‘स्मार्ट’ पायाभूत सुविधांचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या कामकाजावर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे महापालिकेचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी प्रशासनासह ठेकेदारांवर जोरदार टीका केली यावेळी ते म्हणाले की महापालिकेच्या कृपा आशीर्वादावर काही ठेकेदार वर्षांवर्ष पोसले गेले आहेत, अनेक वर्षापासून फक्त बिले घेण्याचे कामच ठेकेदारांनी केल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवलेली आहे असा आरोप नगरसेवक टिंगरे यांनी केला.

बोलताना ते म्हणाले की 2 वर्षांपूर्वी अशीच पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे तात्कालीन आमदार सुनील अण्णा टिंगरे व तात्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह पाहणी दौरा करून 22 ठिकाणी तातडीच्या कामासाठी निधी मंजूर करत निविदा देखील मंजूर करण्यात आल्या होत्या,

ही कामे एम.बी. पाटील कंट्रक्शन कंपनीला देण्यात आली होती मात्र 22 कामापैकी फक्त 4 कामे या कंपनीने पूर्ण केली आहेत व 10 कामे सुरू असल्याचे महापालिका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे; मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता फक्त 2 कामे सुरू आहेत व या पाहणी वेळी महापालिकेचे अधिकारी कन्सल्टंट उपस्थित होते.

सभागृहाची दिशाभूल; कंपनीला नेमकं वाचवतोय कोण?

पुणे महापालिकेच्या सभागृहात हा विषय घेतला असता सभागृहाची दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले आहे प्रत्यक्ष केवळ 2 कामे सुरू असून, पुण्यातील पूरपरिस्थितींना एम. बी. पाटील कंट्रक्शन कंपनी जबाबदार आहे, यासंदर्भात स्टॅंडिंग कमिटीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केल्यावर संबंधितांना कारणे दाखवायची नोटीस बजावण्यात आली मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नाही या कंपनीला नेमकं वाचतोय कोण असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

कंपनीवर सत्ताधारी व प्रशासक मेहरबान; करदात्यांचा पैसा वाया

येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील निविदा प्रक्रियेमध्ये काही ठराविक ठेकेदारांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे,

पुणे महानगरपालिका हद्दीतील 227 ठिकाणची ओळख पटवून 120 गंभीर ठिकाणावर फास्ट व प्राधान्य धरतीवर काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे, त्या कामाला वर्क ऑर्डर देखील देण्यात आले आहेत मात्र अद्याप कुठलेही काम सुरू झालेले नाही केवळ ठेकेदारांना संभाळण्याचे काम सुरू असल्याची सणसणीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी केली.