नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या १८ एजंटांवर गुन्हे मुख्यमंत्री आक्रमक

Pune परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एजंटांपासून गोमंतकीयांनी सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. अशा एजंटांशी व्यवहार करताना नागरिकांनी अत्यंत दक्षता बाळगावी आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये, असेही त्यांनी सांगितले.

नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या प्रकरणांत आतापर्यंत १८ एजंटांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, परदेशात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन अनेक एजंट लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतात आणि नंतर गायब होतात. अनेक प्रकरणांत सांगितलेली नोकरीही बनावट असल्याचे आढळून आले आहे. काही जण बेकायदेशीररीत्या परदेशात गेले असून त्यांनाही सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एनआरआय आयोगाकडे परदेशात राहणाऱ्या सुमारे अडीच लाख गोमंतकीयांची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अनेक जण पर्यटक व्हिसावर परदेशात जाऊन तेथे नोकरी करत असल्याचेही निदर्शनास येत आहे, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

गोमंतकीयांनो सावध व्हा…

सध्या पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अशा प्रकारे परदेशात गेलेल्या काही गोमंतकीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या प्रत्येक गोमंतकीयाला सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले. तसेच परदेशात नोकरीसाठी जाताना नागरिकांनी अधिकृत व नोंदणीकृत माध्यमांद्वारेच प्रक्रिया करावी आणि संशयास्पद एजंटांपासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.