दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Pune राज्याला पाच ट्रिलियन डॉलरची (पाच हजार अब्ज डॉलर) अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत त्या मार्गावर नेणारा सात लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केला.

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा, सध्या सुरू असलेल्या योजना पूर्ण करण्यावर आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत तरतुदी करण्यावर सरकारने दिलेला भर ही २०२६-२७ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

या अर्थसंकल्पात ४० हजार ५५२ कोटी रुपयांची महसुली तूट आणि एक लाख ५० हजार ४९१ कोटी रुपयांची राजकोषीय तूट दर्शवण्यात आली आहे. सरकारने महसुली तूट राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आणि वित्तीय तूट तीन टक्क्यांच्या मर्यादेत ठेवून वित्तीय शिस्त पाळण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे कौतुक फडणवीस यांनी केले आहे.

महायुतीला लाभदायक ठरलेली ‘लाडकी बहीण’ योजना यापुढील काळातही सुरू ठेवण्याबरोबरच शेतकरी कर्जमाफीचा प्रचंड मोठा ताण राज्याच्या अर्थव्यवस्थेवर येणार असल्याने इतर लोकप्रिय घोषणा करणे फडणवीस यांनी टाळले.

जुन्याच सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करत त्याच प्रकल्पांना पुढे घेऊन जाण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाची मांडणी त्यांनी केली. तसेच हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी यावर्षी ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा संचय आणि जलयुक्त शिवार अभियान, वैरण विकासाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अर्थराज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला.

पात्र असलेल्यांनाच लाभ

फडणवीस यांनी आज विधानसभेत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी बाके वाजवून प्रतिसाद दिला. विरोधी बाकांवरुन शिवसेना (यूबीटी) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी मात्र योजनेतील ‘पात्र’ या शब्दावर बोट ठेवले.

यावर फडणवीस यांनी, यापूर्वी देखील ‘पात्र’ असाच शब्द योजनेत होता, नियमानुसार अपात्रांसाठी ही योजना नसल्याचे स्पष्ट केले. ही योजना जाहीर करताना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी कोकणातील शेतकरी नियमित कर्जफेड करत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ यापुढील काळातही सुरू ठेवली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तेव्हा विरोधकांनी, ‘लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?’ अशी विचारणा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट आम्हीच पूर्ण करणार, फक्त न्यायालयात जाऊ नका’ असा चिमटा काढला.

आदित्य ठाकरेंना टोला

ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील दरे गाव परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली. याचवेळी शिवसेना (यूबीटी) पक्षाचे आ. आदित्य ठाकरे यांनी दरे गाव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरून मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले. त्यावेळी फडणवीस यांनी, ‘तुम्ही निसर्गोपचार केंद्राला भेट द्यायला या, म्हणजे तुम्हाला समजेल’, असे सांगत त्यांना टोला लगावला.

चार स्तंभांचा आधार

मुख्यमंत्री फडणवीसांनी शेरोशायरीचा आधार घेत अर्थसंकल्पाची मांडणी केली. विरोधकांना चिमटे आणि मित्रपक्षांना कोपरखळ्या मारत साधारण एक तास २० मिनिटे भाषण करत मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला.

२०२५ चा अर्थसंकल्प मांडताना दिवंगत नेते अजित पवार यांनी ‘पंचसूत्री’चा आधार घेत तो सादर केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्यासाठी प्रगतिशील, शाश्‍वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांचा आधार घेत त्यांच्या अंतर्गत १६ उपक्षेत्रांतर्गत या अर्थसंकल्पाची मांडणी केली.

अर्थसंकल्प (२०२६-२७ अंदाज) (कोटी रुपयांमध्ये)

  • महसुली जमा – ६,१६,०९९
  • महसुली खर्च – ६,५६,६५१
  • महसुली तूट – ४०,५५२
  • एकूण खर्च – ७,६९,४६७
  • राजकोषीय तूट – १,५०,४९१

विभागनिहाय तरतूद

सन २०२६-२७ करिता प्रस्तावित तरतूद (कोटी रुपयांमध्ये)

  • ऊर्जा – २७९६३.३६
  • सार्वजनिक बांधकाम व रस्ते – २६२१८.१६
  • महिला व बालविकास – २४२३१.२८
  • जलसंपदा – १६५६९.२८
  • ग्रामविकास – १३६५१.२०