शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकासावर ‘अर्थ’पूर्ण भर! फडणवीसांकडून बळीराजासाठी ५ मोठ्या घोषणा

Pune News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याची अर्थव्यवस्था सध्या देशातील सर्वात गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून ती ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ‘स्मार्ट’ शेती आणि सर्वसमावेशक विकासावर भर देत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणांचा पाऊस पाडला.

शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट’ घोषणांचा वर्षाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले.

  1. महाविस्तार एआय : ३० लाख शेतकऱ्यांना ‘महाविस्तार’ या एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीविषयक सर्व तांत्रिक आणि बाजारपेठेतील माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाईल.
  2. वसुधा मेसेज सेवा : ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांच्यासाठी ‘वसुधा’ ही विशेष मेसेज सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे सरकारी योजनांची माहिती थेट त्यांच्या फोनवर मिळेल.
  3. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना: या योजनेत आता शेतमजुरांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
  4. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योग योजना: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही नवीन योजना सुरू केली जाणार आहे.
  5. महिला शेतकरी सक्षमीकरण: महिला शेतकऱ्यांच्या उद्योजकतेसाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  6. डिजिटल सेवा विस्तार: शासनाच्या सर्व योजना डिजिटल माध्यमांतून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

२०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था!

राज्याच्या आर्थिक प्रगतीबद्दल विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेमुळे महाराष्ट्राची स्पर्धात्मकता वाढली आहे. “आपण २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, २०३५ मध्ये राज्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी काही विशेष उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी
शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष तरतूद केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांत संतुलित वाढ राखल्यानेच राज्याला ७.९ टक्क्यांचा विकास दर गाठणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.