Ration Card Update: रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! तांदळाऐवजी पुढील 3 महिने मिळणार मका

Pune News राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशनकार्ड धारकांना धान्यात बदल करुन मिळणार आहे.

आत्तापर्यंत धान्यात तांदळाचा समावेश होता पण मार्चमध्ये यात बदल होणार आहे. यामध्ये तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढील तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे.

शिधा वितरणात महत्त्वाचा बदल

मार्चपासून तांदळाऐवजी मक्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्य शासनाने साठा व्यवस्थापन आणि पर्यायी धान्याचा वापर वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.

किती लाभार्थ्यांना होणार फायदा?

अंत्योदय योजनेतील ८७,०६४ रेशनकार्डधारक (३,८६,०३४ लाभार्थी) या बदलाच्या कक्षेत येतात. प्राधान्य कुटुंब योजनेतील ६,३७,११४ रेशनकार्डधारक (२५,६३,९७१ लाभार्थी) यांनाही याचा लाभ मिळणार आहे. एकूण जिल्ह्यातील लाखो कुटुंबांच्या शिध्यात तात्पुरता बदल होणार आहे.

कोणाला किती धान्य मिळणार?

अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा १० किलो मका आणि ११ किलो गहू दिला जाणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला २ किलो गहू आणि १ किलो मका मिळेल. हा बदल सुरुवातीला तीन महिन्यांसाठीच लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.