Pune मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या तळीरामांवर यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. सोमवारी (दि. २) पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या खास शैलीत तळीरामांची शाळा घेत, मद्यप्राशनामुळे होणाऱ्या अपघातांची गंभीरता अधोरेखित केली. ”मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अपघात घडतात आणि त्याचे दुष्परिणाम निष्पाप नागरिकांना भोगावे लागतात. यापुढे अशा चालकांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले. यावेळी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणात वाहन जप्तीबरोबरच चालकांचा चौकात जाहीर सत्कार, तसेच पोलिसांच्या संकेतस्थळावर त्यांचे फोटो प्रसिद्ध करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत २०२५ मध्ये तब्बल ६ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
