ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार; पाटील-अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब

Pune News – महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या युती आणि आघाड्यांच्या हालाचालींना वेग आला आहे. पुणे महापालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भात आज पुण्यात शिवसेना नेते सचिन अहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस पुणे महापालिका निवडणुकीला एकत्रित सामोरो जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी रात्री दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर आज पत्रकार परिषेदतून ही मोठी घोषणा करण्यात आली.

पुण्यात रविवारी रात्री ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात बैठक पार पडली. याचवेळी मनसेच्या नेत्यांनीही या दोन्ही नेत्यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांमध्ये ही महत्त्वाची चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मनसेची भूमिका अद्याप अंतिम झालेली नसून चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, यावेळी सतेज पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारण्यात आले. यावर, आम्ही गाफील नव्हतो आम्ही दक्ष होतो. आमच्या अंतर्गत चर्चा सुरू होत्या. मनसेसोबत अजूनही चर्चा सुरु आहेत. दुपारपर्यंत सगळं स्पष्ट होईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.