राहुल कलाटे यांचा भाजपात जाहीर प्रवेश

Pune चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे) नेते माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाटे यांचा प्रवेश झाला आहे. यावेळी आमदार शंकर जगताप, भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते.

अजित पवारांच्या संपर्कानंतर कलाटे यांचा फडणवीसांसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच स्थानिक नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. त्यामुळेच सर्वाधिक चर्चेत आलेला हाय व्होल्टेज प्रवेश आज मुंबईत झाला असून पिंपरी चिंचवड शहराची राजकीय गणिते बदलणार आहेत.

माजी नगरसेवक राहुल कलाटे आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भाजपची शहरातील ताकद आणखी वाढली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राहुल कलाटे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढवत विजयी उमेदवाराला तगडे आव्हान दिले होते. कलाटे यांनी मिळवलेले मताधिक्य आणि जनाधार शहरभर चर्चेचा विषय ठरला होता. चिंचवड विधानसभा तसेच पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचे मोठे संघटनात्मक जाळे आहे.