कोकाटेंनंतर आता शिंदेसेनेतील आमदार अडचणीत, भाजप आक्रमक

Pune News आमदार आमश्या पाडवी यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी घरकुलांचे लाभ घेताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करावी; अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज केली.

यामुळे सदनिका घोटाळा अंगाशी आल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद गमवावे लागल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत असतानाच आता एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आमश्या फुलजी पाडवी यांचे घरकुल प्रकरण चर्चेत आले आहे.

विद्यमान आमदार आमश्या फुलजी पाडवी हे स्वतः कुटुंबप्रमुख असून त्यांचे पूत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती शंकर पाडवी, त्यांच्या पत्नी सौ.जावराबाई, सौ. रेखाबाई यांनी विविध प्रकारचे मालमत्ता आणि संयुक्त रेशन कार्ड असतानाही संगनमताने शासनाची फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटलेले आहे. कारवाईची मागणी करणारे हे निवेदन आज दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग हुन्या वसावे, प्रताप आतऱ्या वसावे, भाजपाचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष नितेश रायसिंग वळवी, रामसिंग वळवी, जगदिश पाडवी, एडवोकेट सुधीर पाडवी आणि अन्य यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.