Pune News Update – निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची सोमवारी घोषणा केली. १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार जोमाने तयारीला लागले असून सर्वपक्षीय पातळीवर उमेदवारी अर्जांचे वाटपही सुरू झाले आहे. राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाही नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत.
प्रभाग २४ मधून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणय धंगेकर हेही याच प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. बीडकर आणि धंगेकरांसमोर सुनील पवारांचं आव्हान असणार आहे. पुणे पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सुनील पवार यांनी महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपण प्रभाग क्रमांक २४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास त्या पक्षातून निवडून येण्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, याच प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांचा मुलगा देखील निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या सर्वांसमोर सुनील पवार यांचा निभाव लागतो का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महापालिका निवडणुकांचे वेध लागल्याने सर्वच पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची मोठी रांग लागली आहे. अशा परिस्थितीत ३४ वर्षे खाकीची सेवा केलेल्या सुनील पवार यांना कोणता पक्ष जवळ करतो आणि त्यांना उमेदवारी मिळते का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
