NASIK नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण प्रकाश लोंढे व प्रिन्स सिंग यांना नेपाळ बॉर्डर येथून क्राइम ब्रांच युनिट -२ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सहाय्यक गुन्हे शाखा युनिट -२ च्या पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान हिरे व त्यांचे पथक जवळपास २० दिवसापासून त्यांच्या मागावर होते. या घटनेतील नाशिक पोलिस आयुक्तालयास मोठे यश मिळाले आहे.
या अगोदरही दोन वेळा त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, ते निसटले होते. बागपत व राजस्थान या दोन्ही ठिकाणांहून पळण्यात ते यशस्वी झाले होते. त्यादरम्यान राहुल गायकवाड व वेदांत चाळगे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी राहुल गायकवाड याचा भिंतीवरून उडी मारताना त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. भूषण लोंढे, राहुल गायकवाड, प्रिन्स सिंग व वेदांत चाळगे एकाच खोलीत राहत होते. पोलिस येणार अशी कुणकुण लागतात भूषण लोंढे व प्रिन्स सिंग तेथून फरार झाले. तेथून ते हरियाणा येथे गेल्याचा पोलिसांना संशय होता. तेव्हापासून पोलिस पथक मागावर होते.
आयटीआय सिग्नल परिसरातील हॉटेल ऑरामध्ये ५ ऑक्टोबरला गोळीबार झाला होता. या गोळीबारातील मुख्य संशयित भूषण लोंढे दोन महिन्यांपासून फरार होता. त्याला शोधण्यात अखेर नाशिक पोलिसांना यश आलं.
भूषण लोंढे आणि त्याचा सहकारी प्रिन्स सिंग यांना पोलिसांनी नेपाळ सीमेवरुन अटक केली.
भूषण लोंढे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटाचे जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा आहे. गोळीबारानंतर तो फरार झाला होता. खंडणी व हॉटेल ऑरामध्ये झालेल्या गोळीबारात प्रकाश लोंढे व त्यांचा दुसरा मुलगा दीपक लोंढे यांना दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी अटक केली असून ते कोठडीत आहे.
नाशिक पोलिसांनी भूषण लोंढे व त्याचा साथीदार प्रीन्स दोघांच्या तोंडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याने त्यांना पकडण्यासाठी शिताफीने सापळा रचणे गरजेचे होते. दोघांनाही खूप प्लॅनिंग करुन नाशिक पोलिसांनी पकडले.
