MHADA Lottery Result: ‘म्हाडा’च्या घरांकरिता विक्रमी अर्ज, सोडत लवकरच;

Pune news :पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) विविध योजनांसाठी काढलेल्या सुमारे सव्वाचार हजार घरांच्या सोडतीत तब्बल २ लाख १५ हजार ८४७ अर्ज आले आहेत. हा आजवरचा विक्रम असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.

या सोडतीसाठी २ लाख १५ हजार ८४७ अर्ज आले आहेत. प्रत्येक अर्जासाठी ७०८ रुपये शुल्क आणि २० हजार अनामत रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानुसार अर्जदारांनी ४४६ कोटी ९७ लाख ५९ हजार ६७६ रुपये ‘म्हाडा’कडे जमा केले आहेत. अर्जांची संख्या जास्त असल्याने ही सोडत लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या सोडतीची घोषणा ११ डिसेंबर रोजी करण्यात येणार होती. मात्र, अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा दुपटीहून अधिक असल्याने छाननीसाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तारीख योग्यवेळी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोडतीस अर्ज करण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.