Shivsena Vs BJP नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीमधील पक्षच आमने-सामने आले आहेत. त्यामुळे महायुतीमधील नेतेच एकमेकांच्या विरोधात विधाने करताना पाहायला मिळत आहेत.
रविंद्र चव्हाण यांच्या युती टिकवण्याबाबतच्या विधानावर पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहतील. युती टिकवायची की नाही हे एकनाथ शिंदे यांच्या मतावर आहे. आता कोणी काही म्हटलं म्हणून युती तुटत नसते आणि कोणी काही म्हटलं म्हणजे युती होते असं होत नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत, हा त्यांचा विषय आहे, माझा हा विषय नाही”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या काही नेत्यांना चव्हाण यांनी पक्षात प्रवेश दिल्यानंतर दोन पक्षात तणाव निर्माण झाल्याची चर्चा समोर आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविंद्र चव्हाण यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना म्हटलं की, “आमची युती फार पूर्वीच स्व. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी साहेबांनी केली होती. ही युती विचारधारेवर झालेली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार कार्यरत आहे. आमची युती फार पूर्वीपासून एका विचारावर काम करत आहे. ही युती कायम राहील.”
