Pune News वैद्यकीय अभ्यासक्रम अर्थात एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत अर्ज भरताना चुकीची आणि अपूर्ण कागदपत्रे अपलोड करणे २२० विद्यार्थ्यांना चांगलेच भोवले आहे.
राज्य सीईटी सेलने या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करत त्यांना या व पुढील सर्व प्रवेश फेऱ्यांसाठी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे तिसऱ्या प्रवेश यादीतून या विद्यार्थ्यांची नावे वगळली आहेत.
राज्य सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या फेरीसाठी नवीन इच्छुक असलेल्या १७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरताना चुकीची कागदपत्रे अपलोड केली. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कक्षाने शहानिशा केली असता १७० विद्यार्थ्यांची कागदपत्रे खरोखरच चुकीची असल्याचे आढळले. अन्य १०८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कोणतीही कागदपत्रे अपलोड केली नव्हती.
या दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना सीईटी सेलने नोटीस पाठवून त्यांची मूळ व अस्सल कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याची संधी दिली. यानुसार चुकीची कागदपत्रे असलेल्या गटातून फक्त एका, तर कोणतीही कागदपत्रे न भरलेल्या गटातून ५८ विद्यार्थ्यांनी नव्याने कागदपत्रे अपलोड केली. मात्र, नोटिशीला प्रतिसाद न देणारे १७० (चुकीची कागदपत्रे) आणि ५० (कागदपत्रे न भरणारे) असे एकूण २२० विद्यार्थी कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे या २२० विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाच्या या व पुढील फेरीसाठी प्रवेशबंदी केली आहे.
तिसरी यादी जाहीर; १७६४ जागा रिक्त..
दरम्यान, वैद्यकीय प्रवेशाच्या दुसऱ्या यादीनंतर राज्यात एमबीबीएसच्या ७८९ व बीडीएसच्या ९७५ अशा एकूण १७६४ जागा रिक्त आहेत. या जागांसाठी तिसरी प्रवेश यादी गुरुवारी रात्री उशिरा जाहीर होणार आहे. अपात्र ठरलेल्या २२० विद्यार्थ्यांना वगळून ती प्रसिद्ध केली जाणार आहे. तिसऱ्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळेल, त्यांनी दिनांक ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आपला प्रवेश निश्चित करावा, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
