आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की, लोहगावात बंडू खांदवेंशी वादानंतर चालकाला मारहाण

Pune News शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांना पुण्यातील लोहगावात धक्काबुकी झाल्याची घटना घडलीय. ही धक्काबुक्की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधीत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापू पठारे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे पदाधीकारी बंडू खांदवे यांच्यात लोहगाव भागातील एका कार्यक्रमात वाद झाला. या वादातून आमदार पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली तर त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली.

लोहगावातील एका कार्यक्रमात झालेल्या या घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्यात. लोहगाव मधे राहणारे एक सैन्य अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आमदार पठारे आणि बंडू खांदवे हे दोघेही उपस्थित होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.

बंडू खांदवे हे हवेली पंचायत समितीचे माजी सभापती आहेत आणि लोहगाव भागातच राहणारे आहेत. या वादानंतर खांदवे यांच्या समर्थकांनी आमदार पठारे यांना घेराव घातला होता. त्यानंतर आमदार पठारेंचे समर्थक आणि पोलीस त्या ठिकाणी पोहचले. पोलीसांनी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना बाजुला करुन तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.