Pune News राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान उत्पन्नाचा दाखला, वैयक्तिक माहिती व कागदपत्रे सादर केलेली असतात.
ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पडताळणी केलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी पुन्हा माहिती देण्याची आवश्यकता नसून हीच माहिती ग्राह्य धरावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मंत्रालयात मंगळवारी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि इतर सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना वेळेत मिळावी यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.
पाटील म्हणाले, की शिष्यवृत्तीसाठी एकदा विद्यार्थ्यांकडून माहिती अपलोड केल्यानंतर नव्याने माहिती घेण्याची आवश्यकता राहणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे. त्यामुळे अर्जाच्या छाननीसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होईल. तसेच प्रवेशीत विद्यार्थ्यांचा अचूक माहितीही उपलब्ध होईल.
विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती योजनेतील केंद्र सरकारच्या हिस्यापोटी येणाऱ्या ६० टक्के रकमेची माहिती संबंधित महाविद्यालयांना वेळेत मिळावी यासाठी सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी विशिष्ट कार्यप्रणाली तयार करावी.
-चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री
